Type Here to Get Search Results !

जुन्नर-आंबेगावचे प्रांताधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात!

 


पुणे : पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील महसूल विभागाच्या बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे. जुन्नर-आंबेगावचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) गोविंद पांडुरंग शिंदे (वय ४६) यांना २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, मंचर पोलीस ठाण्यात कारवाई सुरू आहे.


लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांची एक भागीदारी फर्म आहे. या फर्ममार्फत त्यांनी पुणे-नाशिक महामार्गालगत नारायणगाव येथे जमीन विकास नियमांनुसार निवासी इमारत उभारण्याचे काम सुरू केले होते. इमारतीचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील आवश्यक कागदपत्रे व नोंदी पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रांत कार्यालयाशी संपर्क साधला होता.

 

हे काम मार्गी लावण्यासाठी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. पडताळणीदरम्यान हा व्यवहार २ लाख रुपयांवर ठरला. तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, एसीबीने सापळा रचून २७ मार्च २०२६ रोजी दुपारी मंचर येथील उपविभागीय कार्यालयात कारवाई केली. यावेळी तक्रारदाराकडून २ लाख रुपये स्वीकारताना गोविंद शिंदे यांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली.


या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments