Type Here to Get Search Results !

चिमण्यांना दिली हक्काची घरे; पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम



जागतिक चिमणी दिनानिमित्त संजय साबळे यांची प्रेरणादायी कृती


चंदगड/प्रतिनिधी : वाढत्या उष्णतेमुळे आणि सिमेंटच्या जंगलांच्या विस्तारामुळे चिमणीसारखा लहानसा पण महत्त्वाचा पक्षी आज अस्तित्वाच्या संकटाला सामोरा जात आहे. अशा परिस्थितीत जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधत दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथील उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांनी चिमण्यांसाठी हक्काची घरे उपलब्ध करून देत एक आदर्श उपक्रम राबविला आहे.

अलीकडे वाढलेली उन्हाची तीव्रता आणि पाण्याची टंचाई यामुळे चिमण्यांच्या जगण्यावर मोठा परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेऊन साबळे यांनी आपल्या घराच्या परिसरात चिमण्यांसाठी लहान-लहान घरटी तयार करून ती योग्य ठिकाणी बसवली आहेत. तसेच त्यांच्या दाण्यापाण्याचीही योग्य व्यवस्था केली आहे. त्यामुळे त्यांच्या परिसरात आज चिमण्यांचा किलबिलाट पुन्हा ऐकू येत आहे.


वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे अनेक पक्षी व प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. चिमणी हा पक्षी मानवाच्या जीवनाशी लहानपणापासून जोडलेला असून, त्याचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.विशेष म्हणजे, संजय साबळे दरवर्षी २० मार्च रोजी आपल्या शाळेतही जागतिक चिमणी दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करतात. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, "प्रत्येकाने आपल्या परिसरात चिमण्यांसाठी थोडीशी जागा देऊन दाण्यापाण्याची सोय केली, तरच हा गोड पक्षी पुन्हा आपल्या आयुष्यात कायम राहील" असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments