Type Here to Get Search Results !

वाचन संस्कृतीची गुढी उभारून नववर्षाचे स्वागत; दि.न्यू.इंग्लिश स्कूलचा उपक्रम


विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी पुस्तकांची अनोखी गुढी


चंदगड : भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व असून, प्रत्येक सणामागे काही ना काही सकारात्मक संदेश दडलेला असतो. नववर्षाच्या शुभारंभी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने दि न्यू इंग्लिश स्कूल,चंदगड येथे पुस्तकांची आकर्षक गुढी उभारण्यात आली.या आगळ्यावेगळ्या गुढीचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य आर. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय संविधान या महत्वपूर्ण ग्रंथाचे विशेष पूजन करून विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची जाणीव करून देण्यात आली.


या गुढीत विश्वकोष, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, विविध शब्दकोश, विज्ञान विषयक पुस्तके, तसेच चरित्र आणि आत्मचरित्र अशा विविध ज्ञानसंपन्न पुस्तकांचा समावेश करण्यात आला होता. या उपक्रमामुळे गुढीपाडव्याच्या पारंपरिक सणाला ज्ञान आणि वाचनाचा नवा आयाम मिळाला.



प्राचार्य आर. पी. पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देत, “वाचनामुळे विचार समृद्ध होतात आणि व्यक्तिमत्व घडते,” असे प्रतिपादन केले.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक संजय साबळे, ग्रंथपाल शरद हदगल आणि ओंकार पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. नववर्षाच्या निमित्ताने राबवलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments