हिंदू एकता, संस्कृती संवर्धन व सामाजिक बांधिलकीवर भर
चंदगड : चंदगड तालुक्यातील दाटे येथे हलकर्णी मंडलातील सकल हिंदू समाज्याच्या वतीने सोमवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याची अपेक्षा आहे.
संमेलनापूर्वी दुपारी ३.३० वाजता दाटे ग्राम प्रदक्षिणा करणारी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि धार्मिक वातावरणात ही दिंडी पार पडणार असून गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.या संमेलनासाठी धर्माचार्य म्हणून नूल तालुका गडिंग्लज येथील धर्माचार्य भगवान गिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून प्रमुख वक्ते म्हणून कौशिक पाध्ये मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या विचारांमधून धर्मजागृती, संस्कृती जतन आणि समाज संघटन यावर विशेष भर दिला जाणार आहे.
दाटे, बेळभाट, हल्लारवाडी, करंजगाव, नरेवाडी, गुडेवाडी, वरगाव, धुमडेवाडी, तावरेवाडी, हलकर्णी, जंगमहट्टी, कलिवडे, किटवडे, आंबेवाडी, सदावरवाडी आदी गावांतील नागरिक या संमेलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ धार्मिक न राहता सामाजिक ऐक्याचा उत्सव ठरणार आहे.
“एकत्र या, संघटित व्हा आणि शक्ती वाढवा” हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनातून समाजातील बंधुभाव, परस्पर सहकार्य आणि सांस्कृतिक अभिमान अधिक दृढ करण्याचा प्रयत्न होत आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments