र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचा २९ वा वर्धापन दिन उत्साहात!
चंदगड : चंदगड येथील खेडूत शिक्षण संस्थेच्या र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचा २९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे होते. प्रमुख व्याख्याते म्हणून कोल्हापूर येथील स्पर्धा विश्वचे प्रमुख एकनाथ पाटील उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एम. माने यांनी प्रास्ताविक करत महाविद्यालयाच्या २९ वर्षांच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यात सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यासाठी महाविद्यालय सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.प्रमुख व्याख्याते एकनाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत ओघवत्या आणि संवादात्मक शैलीत संवाद साधत स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विशद केले. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नसून सातत्यपूर्ण मेहनत, वेळेचे योग्य नियोजन, सकारात्मक दृष्टीकोन, चालू घडामोडींचा नियमित अभ्यास आणि आत्मविश्वास या गोष्टी तितक्याच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते राज्य व देशपातळीवरील कोणतीही स्पर्धा यशस्वीरीत्या जिंकू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आजच्या डिजिटल युगात मोबाईलचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता ज्ञानवृद्धीसाठी करावा, दररोज वृत्तपत्र वाचन, लेखन, सराव चाचण्या आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची सवय जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. अपयशाला घाबरू नका, कारण प्रत्येक अपयश हे यशाची नवी दिशा दाखवत असते, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
यावेळी त्यांनी खेडूत शिक्षण संस्थेने ग्रामीण भागात उभारलेली शैक्षणिक परंपरा, विद्यार्थीकेंद्री उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल विशेष गौरवोद्गार काढले. त्याचबरोबर माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांच्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय व शैक्षणिक योगदानाचा उल्लेख करत ते राज्याच्या विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जाणे ही चंदगड तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरेल, असे मत व्यक्त केले. भरमू अण्णा पाटील यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवड व्हावी, यासाठी संपूर्ण तालुक्यात स्वाक्षरी मोहीम राबवून शासनापर्यंत जनभावना पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रभावी आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या विधानाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विशेष अतिथी भरमू अण्णा पाटील यांनी आपल्या मनोगतात खेडूत शिक्षण संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना ग्रामीण भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित ठेवण्याचे कार्य संस्था अनेक वर्षांपासून करत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव, संस्कार, शिस्त आणि समाजसेवेची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षणाच्या बळावरच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास शक्य असून तरुणांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावेत, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमात संस्थेचे सचिव इंजि. एम. एम. तुपारे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. पंचायत समितीचे सभापती प्रा. विलास नाईक, ज्येष्ठ संचालक प्रा. आर. पी. पाटील तसेच संस्थेचे ऑडिटर ॲड. प्रा. एन. एस. पाटील यांनीही आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या प्रगतीचा गौरव करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एन एस मासाळ, प्रा. शोभा अरबळी व प्रा. वैशाली दावणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन इतिहास विभागप्रमुख प्राध्यापक ए डी कांबळे यांनी मानले.
या कार्यक्रमास पंचायत समितीच्या उपसभापती सौ. संजोती मळवीकर, संस्थेचे संचालक व माजी प्राचार्य पी. आर. पाटील, शामराव मुरकुटे, खजिनदार आनंद सुतार, व्ही. आर. बांदिवडेकर, ॲड. आर. पी. बांदिडेकर, मुख्याध्यापक आर. पी. पाटील, दयानंद भोगण, मारुती गावडे श्री. शिंदे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. २९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे महाविद्यालय परिसरात उत्साह, अभिमान आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले.


Post a Comment
0 Comments