Type Here to Get Search Results !

आदमापूर देवस्थानातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी करा-शिवसेनेची मागणी



कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. बाळूमामा देवस्थानमध्ये कथित मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख प्रा. प्रकाश पाटील व प्रा. संभाजी पाटील यांनी भुदरगडच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात देवस्थानच्या कारभारासंदर्भात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.


देवस्थानमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारामुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या सर्व विश्वस्तांना तात्काळ अटक करून ईडी किंवा तत्सम सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.देवस्थानच्या कारभाराबाबत लंम्बे समितीचा अहवाल जनतेसमोर आणावा, देवस्थानच्या सध्याच्या पोटनियमात दुरुस्ती करून दर तीन वर्षांनी विश्वस्तांची नव्याने नियुक्ती करावी, तसेच देवस्थानचा प्रसाद व अन्नप्रसाद यांचा दर्जा योग्य पद्धतीने राखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.


एकदा विश्वस्त म्हणून काम केल्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीची विश्वस्त पदावर नियुक्ती करू नये, देवस्थान परिसरातील प्रदूषणाच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना कराव्यात आणि भाविकांच्या भावना दुखावतील असे कोणतेही प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.देवस्थानमधील कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे देवस्थानच्या प्रतिमेला धक्का बसत असून, भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच देवस्थानचे लेखापरीक्षण दरवर्षी नियमित करून त्याची माहिती जनतेसाठी जाहीर करावी आणि देवस्थान परिसरातील स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.वरील सर्व मागण्यांवर प्रशासनाने गांभीर्याने अभ्यास करून निश्चित वेळेत कार्यवाही करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.




Post a Comment

0 Comments